Friday, January 3, 2014

आनंद भुवनाचा बोर्ड : सावंतवाडी 

निळा ऑईल पेंट लावलेल्या लाकडी फळ्यांवर , लाकडातच कोरून वरून बसवलेली चंदेरी अक्षरं .

असा अ आता कुठे बघायला मिळतो ?

न चा दांडा नि त्याची गाठ यांचे  प्रमाणबद्ध नातेसंबंध .
साधारणपणे अशा प्रकारच्या देवनागरी वळणाचे अनुस्वार diamond shape चे असतात, इथे तो सरळ वापरलाय. 
आणि इतर अक्षरांच्या मानानं तो थोडा लहान चणीचा असल्यानं गंमत वाढली.
मोठ्या माणसांच्या रांगेत एखाद्याच्या कडेवर छोटं मूल असावं तसं .

भ ची वरची गाठ मोडून मजा केलेली आणि खालची गाठ न च्या गोल गाठी पेक्षा वेगळी , त्रिकोणी ! धमाल.
शीर्षरेघ आणि न ची आडवी रेघ यातल्या अंतरानं मोकळ्या जागेचं (negative space ) महत्त्व अधोरेखित होतं.

लडिवाळ उकार.

व चा मोहक वाकडेपणा .
मधला , oval shape मध्ये बसवलेला श्रीकृष्ण आपल्याला राजा रवि वर्म्याच्या काळात घेऊन जातो . 

हे सगळं असूनही आणखी काही निरागस गोष्टी या अक्षरांत आहेत नि त्या आपल्या ह्या मराठीच काय जगातल्या कोणत्याच भाषेत सांगता येतील असं वाटत नाही. 

इथला उसळ-पाव जगात भारी. 

ह्या वर्षात येईल पुस्तक. 


Thursday, January 2, 2014

New book to be published in 2014 only.

1915 सालचा सुंदर अक्षरातला सुंदर फलक. आजच्या बटबटीत फ्लेक्सच्या गदारोळात
ह्याचं सौंदर्य अजूनही टिकून आहे. देऊळसुद्धा छान आहे अजून.कॅम्पात आहे. जरा मेनरोडवर आहे,. भरपूर गर्दीत, ट्राफिकमधे राम सीता लक्ष्मण मंडळी जरा गांगरल्यासारखी वाटतात, पण हनुमान आहे त्यांचा तसा तिथे उभा बाॅडीगार्ड म्हणून, रस्त्याकडे पाठ करून!

------

अतोनात सुंदर सुंदर अक्षरं असलेले दुकानांचे बोर्ड, कलावंतांकडून हौसेनं लिहवून, रंगवून घेतलेली घरांवरची नावं, देवळांवरची अक्षरं,
संस्थांच्या नावांच्या लाकडात खोदून तयार केलेल्या देखण्या पाट्या. याची एक नजाकत आहे. एक कल्चर आहे. एक वय आहे , ह्याचा एक काळ पण आहे. ह्याचं एक टेक्शचर आहे, एक रोल आहे आपल्या आयुष्यात.
फ्लेकसने सगळे बारा वाजवले. 
विद्रूप बटबटीत शाउटिंग झाली अक्षरं. हेडिंगचे फाॅण्ट टेक्सटला वापरू लागले लोक. टेक्सटचे फाॅण्ट किरटे आजारी वाटू लागले आता. वन्निक, बुडगा वन्निक, कोलकत्ता वगैरे वळणं तर लुप्तच झालीत. मौजेचा टाईप पण आता मौजेचा नाही राहिला... ha h ha
आत्ताआत्तापर्यंत असं नव्हतं ! लोक बरे वागत होते.छान छान बोर्ड असायचे दुकानांवर. सुंदर मोहक कॅरेक्टर असलेली अक्षरं असायची आपल्या अवतीभवती.
आजही शिल्लक आहेत त्यांतली काही.
पुणं तर आहेच.मुंबईत पण सुंदर काम दिसतं.
कोल्हापूरला तर पूर्वी आर्टिस्ट मंडळी फक्त
' अक्षरं बघायला ' जायची.
सांगलीसाताराकोल्हापूरसोलापूरबेळगाव कोकणअमरावतीनागपूरगडचिरोलीपर्यत उभा आडवा तिरका महाराष्ट्र पालथा घालून असली अक्षरं मी कॅमेर्यात बंदिस्त केलीत. प्रसंगी माझ्या दिग्गज फोटोग्राफर मित्रांना पुरेसा त्रास देऊन ह्यात डोकं घालायला लावलं.
आणि असं नाही केलं , की फक्त जुनं तेच भारी. नवीन पण आहेत काही सुंदर अक्षरं,. फ्लेक्सबिक्सला भीक न घालणारी. आर्किऑलाॅजिकल महत्वपूर्ण न मानता 'आवडलं ते दाखवलं' असं केलंय.

फिरतो कशाला मग?

एकदम भारी प्राॅडक्शन करून सुंदर आकारात पुस्तक काढणार. ह्याच वर्षात.